Advertisement Advertisement

समृद्धी महामार्गावरील लुटीचा पर्दाफाश; चिखली तालुक्यातील पाच आरोपी जेरबंद, बनावट पिस्तुले व कारसह मुद्देमाल जप्त…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): समृद्धी महामार्गावर प्रवाशांना तलवार व लोखंडी रॉडचा धाक दाखवून लुटणाऱ्या अंतरजिल्हा टोळीचा कारंजा शहर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) वाशिम आणि चिखली पोलिसांच्या डीबी पथकाच्या संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चिखली तालुक्यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली कार, लोखंडी रॉड, दोन बनावट पिस्तुले आणि पाच मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार राज्यातील पटणा जिल्ह्यातील नंदलालाबाद येथील रहिवासी व बँक व्यवस्थापक प्रशांत युधिष्ठिर रंजन (वय ३८) हे २७ जुलै रोजी समृद्धी महामार्गाने रायपूरकडे जात होते. पहाटे सुमारे ३ वाजताच्या सुमारास कारंजा (लाड) परिसरात थकवा जाणवल्याने त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून विश्रांती घेतली.

याचवेळी काही अज्ञात आरोपींनी तलवार व लोखंडी रॉडचा धाक दाखवत त्यांच्याकडील ८ हजार ५७० रुपये रोख रक्कम आणि सुमारे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले. या लुटीत सुमारे १८ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.

घटनेनंतर कारंजा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत विशेष तपास पथकाची स्थापना केली. स्थानिक गुन्हे शाखा (वाशिम) आणि कारंजा शहर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी चिखली तालुक्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाची मदत घेण्यात आली.

तपासात हर्षद पांडुरंग साबळे (रा. गजानन नगर, चिखली), चेतन संजय माने (रा. बोरगाव वसू), ओम सुरेश सपकाळ (रा. बोरगाव वसू), धनंजय उज्ज्वलसिंग कमळीक आणि गोपाळ श्रीकृष्ण मोरे (रा. दिवठाणा) यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला. प्रथम हर्षद साबळे याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर उर्वरित चार आरोपींनाही अटक करण्यात आली.

आरोपींकडून ८ हजार ५७० रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली कार, लोखंडी रॉड, दोन बनावट पिस्तुले आणि पाच मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल बोरकर करीत आहेत. ही कारवाई कारंजा शहरचे पोलीस निरीक्षक अमर चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम, कारंजा शहर पोलीस तसेच चिखली पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने संयुक्तरीत्या केली. या मोहिमेत पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल गवई तसेच राहुल पायघन, ज्ञानेश्वर शिंदे, प्रशांत धंदर आणि अजय इटवा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!