Advertisement Advertisement

शिक्षिकेचा पाठलाग प्रकरण : आरोपी जि.प. शिक्षक निलंबित; जिल्हा परिषद प्रशासनाची तातडीची कारवाई….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली शहरातील एका ३८ वर्षीय महिला शिक्षिकेचा कथित पाठलाग करून त्यांच्याशी बोलण्याचा आग्रह धरणे व मोबाईल क्रमांकाची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या जिल्हा परिषद उर्दू शाळेतील शिक्षक अकील अहमद अब्दुल रशीद (रा. चिखली) याला जिल्हा परिषद प्रशासनाने ३० जुलै रोजी निलंबित केले आहे. या प्रकरणामुळे शिक्षकवर्तुळात खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने शिस्तभंगाची कारवाई केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शिक्षिका या चिखली शहरातील एका नामांकित शाळेत कार्यरत आहेत. २९ जुलै रोजी सकाळी त्या शाळेकडे जात असताना आरोपी अकील अहमद अब्दुल रशीद याने त्यांचा कथित पाठलाग केला. त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत, “तुम्ही मला खूप आवडता, मला तुमच्याशी बोलायचे आहे,” असे म्हणत त्यांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे घाबरलेल्या शिक्षिकेने आरडाओरडा केला. त्यानंतर शाळेतील सहकारी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीला रोखले. त्यानंतर पीडित शिक्षिकेने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे चिखली पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७८ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. आरोपी हा तालुक्यातील मेरा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने विभागीय स्तरावर चौकशी सुरू करत ३० जुलै रोजी आरोपी शिक्षकाच्या निलंबनाचे आदेश जारी केले. प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार पुढील कायदेशीर व विभागीय कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!