Advertisement Advertisement

“शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल द्या, नाहीतर ट्रॅक्टर घेवून रस्त्यावर बसू;  २५ मे ला चिखली-जालना हायवे जाम करणार!” युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकरानी दिला इशारा…..

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली व देऊळगाव राजा तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर वारंवार पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण होत असल्याने शेतकरी व ट्रॅक्टर मालक मोठ्या संकटात सापडले आहेत. विशेष म्हणजे, डिझेल उपलब्ध असतानाही अनेक पेट्रोल पंप चालक प्रशासनाच्या आदेशाचा हवाला देत ट्रॅक्टर मालकांना कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार देत असल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे.

सध्या खरीप हंगाम तोंडावर आला असून पावसाळी पेरणीची तयारी सुरू आहे. शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर हा प्रमुख आधार बनला आहे. नांगरणी, वखरणी आणि पेरणी यांसारखी महत्त्वाची कामे ट्रॅक्टरशिवाय शक्य नसताना डिझेल अभावी अनेक ट्रॅक्टर जागेवर उभे असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हजारो हेक्टर शेतीची मशागत रखडण्याची भीती व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, डिझेल मिळवण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन पेट्रोल पंपावर तासन्तास थांबणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे कॅनमध्ये डिझेल देणे ही शेतकऱ्यांची गरज आहे. मात्र ज्या पेट्रोल पंप चालकांनी कॅनमध्ये डिझेल भरून दिले, त्यांच्यावर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचा आरोपही शेतकरी व ट्रॅक्टर मालकांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टर मालकांना कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून द्यावे तसेच शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर आणि सचिन कदम यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेतली नाही आणि परिस्थिती कायम राहिली तर येत्या सोमवार दि. २५ मे २०२६ रोजी असंख्य ट्रॅक्टरसह चिखली-जालना हायवेवर अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी व ट्रॅक्टर मालकांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!