Advertisement Advertisement

“विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूल बसांची विशेष तपासणी मोहीम; १ जुलैनंतर नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई”….

खामगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज): शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी खामगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व स्कूल बसांची विशेष फेरतपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम ८ जून ते २० जून २०२६ या कालावधीत पार पडणार असून सर्व स्कूल बस मालक, चालक तसेच शैक्षणिक संस्थांनी आवश्यक फेरतपासणी करून घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.

उच्च न्यायालय, मुंबई यांच्या जनहित याचिका क्र. ९७/२०१६ मधील १७ डिसेंबर २०१९ रोजीच्या आदेशानुसार तसेच स्कूल बस नियमावली २०११ अंतर्गत ही विशेष तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत बसांची तांत्रिक स्थिती, सुरक्षा साधनांची उपलब्धता, आपत्कालीन व्यवस्था तसेच नियमांचे पालन यांची सखोल पडताळणी करण्यात येणार आहे.

परिवहन विभागाने सर्व शाळांनी आपल्या शाळास्तरीय स्कूल बस सुरक्षितता समितीशी संपर्क साधून किंवा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, खामगाव येथे बसांची फेरतपासणी करून घेण्याचे निर्देश दिले आहेत. तपासणी पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास परवानगी दिली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, १ जुलै २०२६ नंतरही फेरतपासणी न केलेल्या स्कूल बसांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व संबंधितांनी वेळेत फेरतपासणी करून घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!