बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक इतर सार्वत्रिक निवडणुकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने घेतली जाते. या निवडणुकीत मतदारांना मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम नोंदवावा लागतो. त्यामुळे शिक्षक मतदारांनी मतदानाची पद्धत समजून घेऊन योग्यरीत्या मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.
जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर
मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतपत्रिकेसोबत देण्यात येणाऱ्या जांभळ्या (व्हायलेट) रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा. अन्य पेन, पेन्सिल, बॉलपॉईंट पेन किंवा कोणतेही लेखनाचे साधन वापरल्यास मतपत्रिका अवैध ठरू शकते. प्रथम पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर ‘१’ हा अंक लिहिणे आवश्यक आहे. हा अंक फक्त एका उमेदवारासमोरच असावा.
पहिली पसंती ‘१’ देणे बंधनकारक
मतदाराला निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना पसंतीक्रम देता येतो. मात्र, पहिली पसंती दर्शविण्यासाठी एका उमेदवाराच्या नावासमोर ‘१’ हा अंक देणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी, तिसरी किंवा पुढील पसंती देणे ऐच्छिक आहे. पसंतीक्रम १, २, ३ अशा अंकांमध्येच लिहावा. एकाच क्रमांकाचा अंक दोन उमेदवारांसमोर लिहू नये. तसेच ‘एक, दोन, तीन’ असे शब्दांमध्ये पसंतीक्रम लिहिणे टाळावे.
‘√’ किंवा ‘X’ची खूण केली तर मत बाद!
मतपत्रिकेवर मतदाराने स्वतःचे नाव, आद्याक्षरे, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा किंवा ओळख पटेल असे कोणतेही लेखन करू नये. पसंती दर्शविण्यासाठी ‘√’ किंवा ‘X’ अशी खूणही करू नये. अशा प्रकारे मतदान केल्यास मतपत्रिका अवैध ठरू शकते.
या चुका केल्यास मतपत्रिका अवैध….
‘१’ हा अंक कोणत्याही उमेदवारासमोर न लिहिणे, एकापेक्षा अधिक उमेदवारांसमोर ‘१’ लिहिणे, ‘१’ कोणत्या उमेदवाराला दिला आहे याबाबत संभ्रम निर्माण होईल अशा पद्धतीने अंक लिहिणे, एकाच उमेदवारासमोर ‘१’ सोबत ‘२’, ‘३’ असे इतर अंक लिहिणे, पसंतीक्रम शब्दांमध्ये लिहिणे किंवा मतदाराची ओळख पटेल अशी खूण करणे, या कारणांमुळे मतपत्रिका अवैध ठरू शकते. तसेच निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या जांभळ्या स्केच पेनव्यतिरिक्त अन्य साधनाने अंक लिहिल्यासही मतपत्रिका बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षक मतदारांनी मतदान करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.














