बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)जिल्हाभरातून चिंता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर आली असून, अवघ्या २४ तासांच्या आत दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून दोन तरुणी घरातून अचानक बेपत्ता झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळगाव काळे तसेच बोराखेडी पोलीस स्टेशन हद्दीतील मोताळा येथील या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी मिसिंग दाखल करून तपास सुरू केला आहे.
आईला घरात कोंडून २७ वर्षीय तरुणी गायब…
जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील २७ वर्षीय तरुणी गूढरीत्या बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी तिच्या आईने जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
माहितीनुसार, १५ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आई आणि मुलगी या दोघीच घरी होत्या. घरात दुसरे कोणी नसल्याचा फायदा घेत तरुणीने घराचा लाकडी दरवाजा बाहेरून बंद केला आणि कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. काही वेळानंतर आईने बाहेर येण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा बाहेरून बंद असल्याचे लक्षात आले. नातेवाईक व परिसरात शोध घेतला, मात्र मुलगी कुठेच मिळून आली नाही. अखेर रात्री जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पुढील तपास पोउपनि अमोल पंडित करीत आहेत.
माय मजुरीवरून आली, पण पोरीचा पत्ता नाही….
दुसरी घटना मोताळा शहरातील वृंदावन नगर येथे घडली. येथील २१ वर्षीय तरुणी घरातून अचानक बेपत्ता झाली आहे. तिच्या आईने बोराखेडी पोलीस ठाण्यात तोंडी रिपोर्ट दिल्यानंतर पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे.
फिर्यादी महिला या नेहमीप्रमाणे १५ मे रोजी सकाळी मजुरीच्या कामावर गेल्या होत्या. त्यावेळी मुलगी घरीच होती. दुपारी साडेएकच्या सुमारास त्या घरी परतल्या असता घराचे मुख्य दार उघडे दिसले. त्यांनी घरात जाऊन मुलीला आवाज दिला, मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही. परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला, पण मुलगी कुठेच आढळली नाही. अखेर ती कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांत धाव घेण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार अशोक आडोकार करीत आहेत.












