खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)तालुक्यातील नागझरी खुर्द येथे उधारीच्या पैशांच्या किरकोळ वादातून एका कुटुंबावर मध्यरात्री हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका महिलेसोबत गैरवर्तन करण्यात आले असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सातच्या सुमारास उधारीच्या पैशांवरून एका तरुणाला सार्वजनिक ठिकाणी काही जणांनी मारहाण केली. त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुन्हा संबंधित तरुणाच्या घरात घुसून त्याला मारहाण करण्यात आली. मात्र, यानंतरही आरोपी थांबले नाहीत.
रात्री साडेनऊच्या सुमारास लोखंडी पाईप व लाकडी काठ्या घेऊन आरोपींचे टोळके संबंधिताच्या घरासमोर जमले आणि घरावर हल्ला चढवला. यावेळी घरातील व्यक्तींना बेदम मारहाण करण्यात आली. मुलाला वाचवण्यासाठी आलेल्या आईला देखील आरोपींनी ढकलाढकली करत तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात फिर्यादी, त्यांचा जावई व आई गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपींनी “जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली होती. घटनेच्या वेळी शेजारी मदतीला धाव घेण्यास घाबरत असल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.













