खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील आवार येथे लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या कारणावरून दोन शेजारी कुटुंबांमध्ये वाद निर्माण होऊन मारहाणीची घटना घडली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर नामदेव काळे (वय ५०, व्यवसाय शेती, रा. आवार) यांनी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी प्रकाश किसन टाले, धिरज प्रकाश टाले व रोशन प्रकाश टाले हे सर्व आवार येथील रहिवासी असून फिर्यादीच्या घराशेजारी राहतात.
फिर्यादीच्या पुतणीचा विवाह आरोपी धिरज टाले याच्यासोबत ठरला नसल्याचा राग आरोपींच्या मनात होता. याच कारणावरून ८ जून रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर आरोपींनी संगनमत करून वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
वादाचे रूपांतर मारहाणीत होत आरोपींनी फिर्यादी रामेश्वर काळे, त्यांचा भाऊ तसेच सून यांना काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी आरोपींनी जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
फिर्यादीच्या तक्रारीसह वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे खामगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपींविरुद्ध बीएनएस कलम 118(1), 352, 351(2) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे













