सैलानी (बुलडाणा कव्हरेज न्युज): सैलानी बाबांच्या यात्रेत ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे गोड स्वप्न दाखवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चिखली तालुक्यातील साकेगाव येथील आशिक रिवाज पवार याला रायपूर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध बलात्कार व पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी २०२४ मध्ये सैलानी बाबांच्या यात्रेसाठी आली होती. यात्रेदरम्यान तिची ओळख साकेगाव येथील आशिक रिवाज पवार याच्याशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. आरोपीने मुलीला लग्नाचे आमिष दाखवत आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
तक्रारीनुसार, लग्नाचे आश्वासन देत आरोपीने मुलीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, नंतर लग्नास नकार देत तिची फसवणूक केली. अखेर पीडित मुलीने रायपूर पोलीस ठाण्यात धाव घेत न्यायाची मागणी केली.
तक्रारीवरून रायपूर पोलिसांनी तत्काळ बलात्कार व पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. ठाणेदार नीलेश सोळंके यांनी तपासासाठी विशेष पथक नियुक्त केले.
पोलीस कर्मचारी दशरथ शितोळे, राहुल जाधव, अनंत कळमकर आणि अख्तर शेख यांनी अवघ्या काही तासांत आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरीशकुमार पाटील व लक्ष्मण शिंदे हे ठाणेदार नीलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत….













