चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील डोंगरगाव येथील महाराष्ट्रस्तरीय कबड्डीपटू रोहन विजय वाळोकर (वय २३) याचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रोहन हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने गावभर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहन हा मंगळवारी दुपारी आपल्या मित्रांसोबत डोंगरगाव परिसरातील धरणात पोहण्यासाठी गेला होता. सुरुवातीला तो पाण्यात बऱ्याच आतपर्यंत पोहत गेला. थकल्यानंतर तो हवा भरलेल्या ट्यूबवर बसला. मात्र अचानक जोराचा वारा सुटल्याने तोल जाऊन तो पाण्यात पडला.
ट्यूब पुढे वाहून गेल्याने रोहनने ती पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण ट्यूब हाताला लागली नाही. धरणाचा काठही दूर असल्याने तो बराच वेळ जीवाच्या आकांताने पोहत राहिला. अखेर थकव्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
घटनेनंतर मित्रांनी व ग्रामस्थांनी शोध घेतला, मात्र रात्रीपर्यंत काहीच सुगावा लागला नाही. त्यानंतर बुलढाणा व अकोला येथील रेस्क्यू टीमला बोलावण्यात आले. रात्रभर सुरू असलेल्या शोधमोहीमेनंतर बुधवारी दुपारी अकोला रेस्क्यू पथकाला रोहनचा मृतदेह आढळून आला.
रोहनचा मृतदेह गावात आणताच संपूर्ण डोंगरगावात शोककळा पसरली. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कबड्डी क्षेत्रात नाव कमावणारा होतकरू खेळाडू काळाच्या पडद्याआड गेल्याने क्रीडा क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त होत आहे.














