चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): लोकमतचे चिखली तालुका प्रतिनिधी सुधीर चेके पाटील यांचे वडील विश्वनाथ शिवराम चेके पाटील (वय ८२, रा.शाहु नगर चिखली) यांचे रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
जी.प. हायस्कूल, चिखली येथून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेले, शिस्तप्रिय शिक्षक, आदर्श शिक्षणतज्ज्ञ, गजानन महाराजांचे निस्सीम भक्त तथा ‘चेके गुरूजी’ म्हणून सर्वदूर परिचित असलेले विश्वनाथ चेके पाटील यांनी शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा दिली. शिस्त, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम यामुळे ते सर्वांच्या आदराचे स्थान बनले होते. जी.प. हायस्कूल, चिखली येथून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांचा समाजाशी आणि शिक्षण क्षेत्राशी असलेला जिव्हाळा कायम राहिला. आध्यात्मिक वृत्ती लाभलेल्या चेके गुरूजी यांची श्री गजानन महाराजांवर नितांत श्रद्धा होती. साधी राहणी, उच्च विचार आणि सेवाभावी स्वभावामुळे त्यांनी समाजात वेगळा ठसा उमटविला. शिक्षण क्षेत्राबरोबरच ते प्रगतशील व सधन कास्तकार म्हणूनही ओळखले जात होते. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीत नवनवीन प्रयोग करण्याची त्यांना विशेष आवड होती.
शेती हा केवळ व्यवसाय नसून जीवनाचा अविभाज्य भाग असल्याची त्यांची धारणा होती. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ अनेक शेतकऱ्यांनी घेतला. त्यांचा अंत्यविधी दुपारी १ वाजता चिखली येथील राऊतवाडी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात पार पडला. यावेळी राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक, पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, माजी विद्यार्थी, सहकारी शिक्षक, नातेवाईक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्रकार सुधीर व शिक्षक दिनेश हे दोन मुले, सुना, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे.
त्यांचा रक्षाविसजर्न व अस्थी कलश दर्शन विधी ३० जून २०२६ रोजी आशीर्वाद मंगल कार्यालय, सवाणा रोड चिखली येथे सकाळी ठीक १० वाजता पार पडणार आहे
















