बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बिरसिंगपूर येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील २२ वर्षीय तरुणी प्रतिभा प्रकाश मुळे हिचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी विष्णू भिवसन मुळे यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
प्रतिभाचे वडील प्रकाश मुळे हे अल्पभूधारक शेतकरी असून, सातत्याने होणारी नापिकी, कुटुंबाची हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि खासगी कर्ज यामुळे ते चिंतेत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रतिभा अभ्यासात हुशार होती; मात्र घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिला उच्च शिक्षण घेता आले नाही. कुटुंबाची परिस्थिती पाहून तीही निराश झाली होती, असे सांगण्यात येत आहे.
घटनेच्या दिवशी प्रतिभाचे वडील आणि लहान भाऊ आधारकार्ड अपडेट करण्यासाठी बुलडाणा येथे गेले होते, तर तिची आई दुसऱ्याच्या शेतात सोयाबीन काढण्यासाठी गेली होती. दरम्यान, सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रतिभाची चुलत बहीण संध्या शेतातून घरी परतली. त्यावेळी तिला शेजारी असलेल्या काकांचे घर बंद दिसले. तिने दरवाजा ठोठावला; मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिने खिडकीतून पाहिले असता प्रतिभा घरात बेशुद्ध अवस्थेत आढळली. यानंतर तिने तातडीने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर प्रतिभाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.















