दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्यात वाढत्या तापमानाचा फटका आता केवळ माणसांनाच नव्हे तर जनावरांनाही बसू लागला आहे. मौजे निमगाव वायाळ येथील गट क्रमांक ६७ मध्ये ३ मे रोजी दुपारी घडलेल्या घटनेत शेतकरी विनोद मधुकर वायाळ यांचा बैल उष्माघाताने मृत्युमुखी पडला.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास संबंधित बैल शेतात झाडाखाली बांधलेला असताना अचानक कोसळला. परिसरात तीव्र उष्णतेची लाट असल्याने उष्माघातामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेनंतर तात्काळ संबंधित विभागाकडे प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला.
या घटनेमुळे शेतकरी विनोद वायाळ यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शेतीकामासाठी अत्यावश्यक असलेले जनावर गमावल्याने त्यांच्यावर आर्थिक व मानसिक ताण वाढला आहे.
दरम्यान, सध्या तापमान सातत्याने वाढत असल्याने पशुपालकांनी जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, जनावरांना पुरेशी सावली, थंड पाणी व विश्रांती मिळेल याची व्यवस्था करावी. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात जनावरांना उघड्यावर ठेवणे टाळावे तसेच वेळोवेळी पाणी पाजणे आणि शरीरावर पाणी शिंपडणे यांसारख्या उपाययोजना केल्यास उष्माघाताचा धोका कमी होऊ शकतो.
ही घटना प्रशासनासाठीही इशारा ठरत असून ग्रामीण भागात जनावरांच्या संरक्षणासाठी जनजागृती मोहीम राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.













