चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) :चिखली तालुक्यातील उत्रादा येथील जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याने विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे काम पूर्ण करण्यात आले असले, तरी मधील मुख्य भाग अपूर्ण राहिल्याने तेथे मोठा खड्डा पडला असून पावसाचे पाणी साचून मोठे डबके निर्माण झाले आहे.
या डबक्यामुळे शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांना चिखलातून पायी चालत शाळेत जावे लागत असून घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधितांकडे तक्रारी केल्याचा दावा केला आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
“एखादा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. शाळेसमोरील अर्धवट रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना सुरक्षित व सुकर मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.














