मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): तालुक्यातील धुपेश्वर येथील पूर्णा नदीच्या पात्रात पाण्यात बुडाल्याने एका ६० वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुशीलकुमार बाबूलाल पोपट (वय ६०, रा. कुलमखेड) हे सोमवारी पहाटे धुपेश्वर येथे देवदर्शनासाठी जात असल्याचे घरच्यांना सांगून घरातून निघाले होते. सकाळच्या सुमारास धुपेश्वर येथील पूर्णा नदीच्या पात्रात एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी ठेवलेल्या शर्टाच्या खिशात सापडलेल्या आधारकार्डाच्या आधारे मृताची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर मृताचे पुतणे संकेत अरुण ठक्कर यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख सुशीलकुमार बाबूलाल पोपट अशी निश्चित केली.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशीलकुमार पोपट हे धार्मिक प्रवृत्तीचे असून धुपेश्वर येथे देवदर्शनासाठी नियमित जात होते. देवदर्शनापूर्वी पूर्णा नदीत स्नान करण्यासाठी उतरले असता तोल जाऊन त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणात कोणावरही संशय नसल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले असून, एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.












