Advertisement Advertisement

युरियाचा पुरेसा साठा, तरीही शेतकऱ्यांची भटकंती; कृत्रिम टंचाईचा आरोप!” खतासाठी शेतकऱ्यांची धावपळ…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): तब्बल १५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी कपाशीसह अन्य पिकांना खत देण्याच्या कामांना वेग दिला आहे. मात्र, जिल्ह्यात युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा प्रशासनाचा दावा असतानाही शेतकऱ्यांना युरियासह रासायनिक खतांसाठी कृषी सेवा केंद्रांची पायपीट करावी लागत असल्याने नाराजीचे वातावरण आहे.

जिल्हा परिषद कृषी विभागाच्या पोर्टलवरील माहितीनुसार, २२ जुलै रोजी बुलढाणा जिल्ह्यात सुमारे २ लाख ३९ हजार ६२७ युरियाच्या गोण्या उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तरीही अनेक कृषी सेवा केंद्रांवर “युरिया उपलब्ध नाही” असे सांगून शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत पाठवले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे बाजारात युरियाचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

पुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

जिल्ह्यात पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात खतांचा तुटवडा जाणवत असल्याने वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नियोजनबद्ध वितरण न झाल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण होत असल्याचा आरोप होत असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.

जादा दराने खतविक्रीचा आरोप

दरम्यान, खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथील एका कृषी सेवा केंद्रावर छापील कमाल किरकोळ किंमतीपेक्षा जादा दराने खतांची विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी शेतकरी गोपालसिंग दिवाणसिंग तोमर यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांचे म्हणणे

“जिल्ह्यात युरियाचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. वितरण प्रक्रियेत काही अडथळे निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांना वेळेत खत मिळावे यासाठी वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवले जात आहे. कृत्रिम तुटवडा किंवा अधिक दराने विक्री आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.”

— अमोल बंड, कृषी गुण नियंत्रक, खामगाव

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!