Advertisement Advertisement

हप्ते रखडले… घरकुलही अर्धवट! प्रधानमंत्री आवास योजनेतील केवळ ५,६९९ घरे पूर्ण; निधीअभावी उर्वरित बांधकामे रखडली…

खामगाव (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : पावसाळ्याच्या सुरुवातीने प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) – २ अंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या हजारो लाभार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शासनाकडून हप्त्यांचे वितरण वेळेत न झाल्यामुळे अनेकांची घरे अर्धवट अवस्थेत असून, लाभार्थ्यांना अजूनही जीर्ण अथवा तात्पुरत्या घरात राहण्याची वेळ आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यासाठी या योजनेअंतर्गत १ लाख ५ हजार १८० घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी १ लाख ३ हजार ४७१ घरकुलांना मंजुरी मिळाली असली, तरी प्रत्यक्षात केवळ ५ हजार ६९९ घरे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे तब्बल ९७ हजार ७७२ घरांचे बांधकाम विविध टप्प्यांवर प्रलंबित असल्याचे चित्र आहे.

अनेक लाभार्थ्यांनी पहिला किंवा दुसरा हप्ता मिळाल्यानंतर स्वतःच्या आर्थिक क्षमतेनुसार बांधकाम सुरू केले. मात्र, पुढील हप्ते वेळेवर न मिळाल्याने कामे अर्धवट थांबली आहेत. पावसाळा सुरू झाल्यामुळे या अपूर्ण बांधकामांचे नुकसान होण्याचा धोका वाढला आहे. काही ठिकाणी भिंती उभारल्यानंतर काम बंद पडले आहे, तर अनेक घरांना अद्याप छप्परही नसल्याने पावसाचे पाणी थेट बांधकामात शिरत आहे.

दरम्यान, प्रलंबित हप्ते तातडीने वितरित करून रखडलेली घरकुले पूर्ण करण्याची मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे. अन्यथा पावसाळ्यात हजारो कुटुंबांना असुरक्षित आणि जीर्ण घरांमध्येच दिवस काढावे लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!