बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा तालुक्यातील हातणी गावाजवळ रस्त्यावर अचानक आलेल्या मोकाट जनावराला वाचविण्याच्या प्रयत्नात शिक्षकांच्या कारचा झाडाला धडकून अपघात झाला. या अपघातात कारमधील चालकासह अनेक शिक्षक-शिक्षिका जखमी झाल्याची घटना रविवारी (६ जुलै) दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा तालुक्यातील धाड येथील जिल्हा परिषद शाळेतील काही शिक्षक-शिक्षिका सकाळची शाळा आटोपल्यानंतर दुपारी सुमारे १ वाजता कारने बुलढाण्याकडे निघाले होते. हातणी गावाजवळील शिवाजी महाविद्यालय परिसरात रस्त्यावर अचानक एक मोकाट जनावर आडवे आले. जनावराला धडक बसू नये म्हणून चालकाने कार वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन जोरात आदळली.
अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारमधील जखमी शिक्षक व शिक्षिकांना बाहेर काढले. त्यानंतर सर्व जखमींना उपचारासाठी बुलढाणा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका शिक्षिकेला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. अपघातातील जखमींची अधिकृत नावे मात्र वृत्त लिहिपर्यंत समजू शकली नव्हती.
घटनेमुळे काही काळ बुलढाणा-धाड मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. दरम्यान, या परिसरात मोकाट जनावरांचा वाढता वावर अपघातांना कारणीभूत ठरत असल्याने त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.














