सोनाळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अंबाबरवा अभयारण्याच्या बफर क्षेत्रातील जटाशंकर परिसरात सोमवारी (६ जुलै) दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास वाघाने केलेल्या हल्ल्यात एका २६ वर्षीय आदिवासी युवकाला गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यात दोन गायी व तीन वासरे अशा पाच पाळीव जनावरांचाही वाघाने फडशा पाडल्याने हडियामाल गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जखमी युवकाचे नाव अनिल अर्जुन सोळंके (वय २६, रा. हडियामाल) असे असून तो गुरे चारण्यासाठी जटाशंकर परिसरात गेला होता. त्याचवेळी वाघाने अचानक हल्ला चढविला. या हल्ल्यात त्याच्या चेहरा, पाठ, हात, छाती व पोटावर गंभीर पंजाचे घाव बसले असून तो रक्तबंबाळ झाला.
घटनेची माहिती मिळताच गस्तीवर असलेले वनपाल देव बेराळ, वनपाल राठोड तसेच गावातील जयमाल भायडया यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी अनिल सोळंके याला शासकीय वाहनातून सोनाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला १०८ रुग्णवाहिकेद्वारे शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले.
जखमीने दिलेल्या माहितीनुसार, वाघाने आधी दोन गायी व तीन वासरांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडला. त्यानंतर त्याच्यावरही हल्ला केला. जखमीने मोबाईलवरून गावकऱ्यांना माहिती दिल्यानंतर ग्रामस्थ आणि वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
ही घटना सोनबर्डी बीटमधील कंपार्टमेंट क्रमांक ३६३ मध्ये घडली. जटाशंकर हा प्रसिद्ध पर्यटन व धबधबा परिसर असल्याने या घटनेनंतर पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेची नोंद सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालयात करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने माहिती देण्यात आली आहे. वन विभागाने परिसरात गस्त वाढवून नागरिकांनी जंगल परिसरात जाताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे














