डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत सोन्याचे दागिने आणि दुचाकीसह सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी डोणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी येथील प्रल्हाद रामकिसन जाधव (वय ५०) हे २ जुलै रोजी कुटुंबासह शेगाव येथे देवदर्शनासाठी गेले होते. दरम्यान, ५ जुलै रोजी सकाळी शेजारी गणेश खोडके यांनी दूरध्वनीवरून त्यांच्या घराचे कुलूप तुटले असून मुख्य दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. त्यानंतर जाधव कुटुंबीय तातडीने गावात परतले.
घराची पाहणी केली असता, अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला होता. घरातील कपाट फोडून सुमारे ४० हजार रुपये किमतीच्या तीन सोन्याच्या अंगठ्या आणि २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे झुमके चोरून नेल्याचे आढळून आले. तसेच घराबाहेर उभी असलेली एमएच-२८-सीडी-०५०२ क्रमांकाची अंदाजे १० हजार रुपये किमतीची दुचाकी देखील चोरट्यांनी लंपास केली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, डोणगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चोरीचा तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.














