आसलगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): महापुरामुळे खरडून गेलेल्या शेतीच्या पंचनाम्यांमध्ये ‘पोटखराब वर्ग अ’ आणि कथित २० आरच्या निकषाबाबत निर्माण झालेला संभ्रम तातडीने दूर करावा, या मागणीसाठी ३१ ऑगस्ट रोजी जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. प्रकाश विठ्ठल भिसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रशासनाच्या भूमिकेबाबत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी प्रतिकात्मक प्रेत ठेवून त्यावर विविध प्रश्नांचे फलक लावले. अतिवृष्टी, महापूर, खरडून गेलेली जमीन, पंचनामा, पोटखराब तसेच शेतकऱ्यांचा बळी अशा आशयाचे फलक लावत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. पूरग्रस्त शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करताना निर्माण झालेला संभ्रम आणि प्रशासनाकडून याबाबत स्पष्ट लेखी माहिती मिळत नसल्याचा निषेध यावेळी करण्यात आला.
२० आरचा निकष नेमका कुणाचा?
पंचनामे करताना काही शेतकऱ्यांना २० आरपेक्षा जास्त क्षेत्र खरडून गेले असल्यास ते ‘पोटखराब वर्ग अ’मध्ये जाईल, अशी माहिती सांगितली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, महसूल प्रशासनासोबत झालेल्या चर्चेत नायब तहसीलदार यांनी असा कोणताही आदेश प्रशासनाने दिलेला नसून २० आरच्या निकषाबाबतची माहिती अफवा असल्याचे सांगितले, असा दावा आंदोलकांनी केला.
यावरून आंदोलकांनी प्रशासनाला थेट सवाल केला की, ‘२० आरचा कोणताही आदेश नाही, तर मग पंचनामे करताना शेतकऱ्यांना हा निकष कोणी सांगितला? आणि कोणत्या आदेशाच्या अथवा नियमाच्या आधारे सांगितला?’
या संपूर्ण प्रकरणाचा लेखी खुलासा करून शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करावा आणि चुकीची माहिती देणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या जमिनीच्या भवितव्याचा प्रश्न
हा प्रश्न केवळ महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पंचनाम्यापुरता मर्यादित नसून शेतजमिनीच्या महसुली नोंदी आणि भविष्यातील शेतीच्या वापराशी संबंधित असल्याचे प्रकाश भिसे यांनी सांगितले. त्यामुळे संपूर्ण शेतकरी समाजाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रशासनाने तातडीने लेखी खुलासा करून २० आरच्या निकषाबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
















