दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : समृद्धी महामार्गावर माडवा शिवारातील चॅनल क्रमांक ३१० जवळ रविवारी दुपारी भीषण अपघात घडला. शेतात फवारणी करताना पंपातील पेट्रोल संपल्याने पेट्रोल आणण्यासाठी समृद्धी महामार्गावरील कॅरिडोर ओलांडणाऱ्या ६८ वर्षीय शेतकऱ्याला अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे की, झोटिंगा येथील श्रीराम पांडुरंग कुटे (वय ६८) हे ३० ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास माडवा शिवारातील त्यांच्या शेतात फवारणीचे काम करीत होते. दरम्यान, फवारणी यंत्राच्या पेट्रोल पंपातील पेट्रोल संपल्याने ते समृद्धी महामार्गाजवळील पेट्रोल पंपावर पेट्रोल आणण्यासाठी निघाले.
समृद्धी महामार्गावरील नागपूर रस्ता कॅरिडोर ओलांडत असताना विरुद्ध दिशेने आलेल्या एका अज्ञात भरधाव वाहनाने श्रीराम कुटे यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कुटे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बीबी पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, लोणार येथे पाठविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, अपघातानंतर समृद्धी महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होऊ नये म्हणून पीसी इरफान शेख, आकाश यादव, राहुल कायंदे तसेच मलकापूर येथील एम. पो. केंद्राच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बॅरिकेडिंग केले आणि वाहतूक सुरळीत केली.
या प्रकरणी मृतकाचा मुलगा मारुती श्रीराम कुटे यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली असून, अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.













