Advertisement Advertisement

इसरूळ शिवारात बिबट्याचा धुमाकूळ! पाळीव कुत्र्याची शिकार करून बिबट्या पसार; शेतकऱ्यांची झोप उडाली, वनविभागाने पिंजरा लावला!

इसरूळ (भिकनराव भुतेकर:बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील इसरूळ शिवारात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इसरूळचे माजी सरपंच शामसुंदर नारायण भुतेकर पाटील यांच्या फार्म हाऊसजवळील गुरांच्या गोठ्यात बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना २७ ऑगस्टच्या रात्री घडली. या घटनेनंतर वनविभागाने तातडीने दखल घेत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंचरवाडी बीटअंतर्गत येणाऱ्या गाव राखीव जंगलापासून इसरूळ येथील भुतेकर पाटील यांच्या फार्म हाऊसचे अंतर सुमारे ३५० मीटर आहे. रात्रीच्या वेळी शिकारीच्या उद्देशाने बिबट्या गोठ्याच्या परिसरात आला. त्यावेळी जागलीवर असलेल्या पाळीव कुत्र्यावर त्याने हल्ला केला. बिबट्याने कुत्र्याच्या गळ्याला चावा घेतल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आल्याचे सांगण्यात आले. मात्र, बिबट्या प्रत्यक्ष दिसून आला नसल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नियत क्षेत्र अधिकारी जी. एम. पोटे यांनी २८ ऑगस्ट रोजी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. यासोबतच घटनास्थळाचे जीपीएस फोटो संबंधित अहवालासोबत जोडण्यात आले असून, घटनेची माहिती इसरूळ ग्रामपंचायतीलाही देण्यात आली आहे.

वनविभागाकडून पिंजरा लावला

शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आवश्यक पिंजऱ्यास तातडीने मंजुरी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक पोटे यांनी २९ ऑगस्ट रोजी बिबट्याच्या हालचाली असलेल्या शेत परिसरात पिंजरा लावला. यावेळी वनसहाय्यक ऋषिकेश तुपकर हेही उपस्थित होते.

यापूर्वीही बिबट्याचा हल्ला

इसरूळ शिवारात यापूर्वीही बिबट्याचा वावर आढळून आला आहे. ३० मार्च रोजी बिबट्याने कृष्णा काळे यांच्या गाय व वासरावर हल्ला करून एका गोऱ्ह्याची शिकार केल्याची घटना घडली होती. गावालगत तसेच शेत परिसरात बिबट्याचा वावर वारंवार दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जाणे धोकादायक ठरत असून, वनविभागाने बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!