Advertisement Advertisement

टुणकी-लाडणापूर रस्त्यावर भीषण अपघात; आईसह ७ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू! मालवाहू वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; दोन जण गंभीर जखमी, संतप्त नागरिकांनी वाहन पेटविले….

संग्रामपूर (बुलढाणा कव्हरेज न्युज): टुणकी-लाडणापूर रस्त्यावर मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात आईसह सात महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. शुक्रवारी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनंतर संतप्त नागरिकांनी मालवाहू वाहन पेटवून दिल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टुणकी-लाडणापूर रस्त्यावर चारचाकी वाहन क्रमांक एमपी १२ झेडएच ९३४२ ने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील पूर्वी संजय वासकला (वय ७ महिने) या चिमुकलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तिची आई सपना संजय वासकला (वय २६, रा. जसुंदी, मध्य प्रदेश) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघातात सनवीर संजय वासकला (वय ६, रा. जसुंदी, मध्य प्रदेश) आणि कमलेश भुरलाल चंगळ (वय ३२, रा. मोरवा, ता. तेल्हारा, जि. अकोला) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर नागरिकांचा संताप….

आई आणि चिमुकलीचा मृत्यू झाल्याने घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त नागरिकांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या मालवाहू वाहनाला आग लावली. तसेच वाहन चालकाला मारहाण केल्याची माहिती आहे. घटनास्थळी आलेल्या रुग्णवाहिकेबाबतही गोंधळाची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी मदतकार्य सुरू करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली.

जखमी चालकाला अकोला येथे हलविले….

अपघातात मालवाहू वाहनाचा चालकही जखमी झाला. सोनाळा पोलिसांनी त्याला तातडीने वाहनातून बाहेर काढून शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार चालकाला अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांकडून पंचनामा; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू…..

अपघाताची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी संबंधित पोलिसांना तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या तसेच मदतकार्य करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सोनाळा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा व इतर आवश्यक कायदेशीर कार्यवाही सुरू केली.

अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, वाहनाचा वेग किती होता आणि अपघातास कोणाची चूक कारणीभूत आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!