Advertisement Advertisement

पोरीनं लग्नाला नकार दिला, तर पठ्ठ्या थेट तिच्या मागं! सरंबा फाट्यावर दुचाकी अडवून तमाशा; आई-बापाला धमकी दिल्याचा आरोप….

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): १९ वर्षीय तरुणीने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून तिचा पाठलाग करून मोटारसायकल अडविल्याचा आणि तिच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार सरंबा फाटा येथे घडला. यावेळी आरोपीने अश्लील हातवारे करत तरुणीच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अंढेरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय तरुणी आपल्या आई-वडिलांसोबत मोटारसायकलवरून घरी जात होती. त्यावेळी किशोर बबन चेके (रा. सरंबा, ता. देऊळगाव राजा) याने तिचा पाठलाग केला. सरंबा फाट्याजवळ आरोपीने त्यांची मोटारसायकल रस्त्यात अडविली.

यावेळी तरुणीच्या आई-वडिलांनी मोटारसायकल का अडविली, अशी विचारणा केली. त्यावर आरोपीने, ‘तुमची मुलगी मला आवडते, त्यामुळे मी तिचा पाठलाग करत राहणार,’ असे सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तरुणीच्या आई-वडिलांनी आरोपीला विरोध करत मुलीच्या नादाला लागू नकोस आणि तेथून निघून जाण्यास सांगितले. मात्र, आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच तरुणीशी जवळीक करण्याचा प्रयत्न करून अश्लील हातवारे केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर तरुणीच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी आरोपी किशोर बबन चेके याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७८, ७९, १२६(२) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास अंढेरा पोलिसांकडून सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!