मुंबई (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी आज, २७ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनाची हाक दिल्याने राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मंत्रालय परिसरातील मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि वाहनांचा प्रतीकात्मक लिलाव करण्याची घोषणा तुपकरांनी केल्याने पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.
मुंबईसह राज्यातील विविध भागांत पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, मुंबईकडे निघालेल्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी आणि वाहनांची तपासणी सुरू आहे. अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये रविकांत तुपकर अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसून ते ‘आऊट ऑफ रडार’ असल्याचे चित्र आहे.
लातूरमध्ये ५० गाड्यांचा ताफा अडवला
मुंबई आंदोलनासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी विविध मार्गांवर बंदोबस्त वाढवला आहे. लातूर-सोलापूर मार्गावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांच्यासह तब्बल ५० वाहनांचा ताफा पोलिसांनी अडविल्याची माहिती आहे. या ताफ्यातील कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
बुलढाणा, खामगाव, चिखलीसह राज्यातील विविध भागांतून मुंबईकडे निघालेल्या कार्यकर्त्यांवरही पोलिसांची नजर आहे. आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू असल्याने राज्यभर पोलिस विरुद्ध आंदोलक असा संघर्षाचा माहोल निर्माण झाला आहे.
मंत्रालय परिसरात कडेकोट बंदोबस्त
तुपकरांनी आज सकाळी १० वाजता मंत्रालय परिसरातील मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि वाहनांचा प्रतीकात्मक जाहीर लिलाव करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मंत्रालय परिसरासह मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
एकीकडे पोलिसांकडून कार्यकर्त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे रविकांत तुपकर नेमके कुठे आहेत, याबाबत कमालीची गुप्तता आहे. यापूर्वीही तुपकरांनी पोलिसांच्या बंदोबस्ताला चकवा देत अचानक आंदोलनस्थळी हजेरी लावल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे यावेळीही ते पोलिसांना चकवा देऊन थेट आंदोलनस्थळी पोहोचणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या
तुपकरांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांऐवजी दोन लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे, पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, जुन्या कर्जमाफी योजनांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, तसेच कर्ज पुनर्गठनामुळे कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचाही कर्जमाफीमध्ये समावेश करण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या त्यांनी मांडल्या आहेत.
या मागण्यांवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी तुपकरांची भूमिका आहे. त्यासाठीच मुंबईत आंदोलनाची हाक देण्यात आली असून, आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि वाहनांचा प्रतीकात्मक लिलाव करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
‘काहीही झाले तरी आंदोलन होणारच!’
पोलिसांनी कितीही अडथळे निर्माण केले, कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले किंवा मार्गांवर नाकाबंदी केली तरी आंदोलन होणारच, अशी आक्रमक भूमिका रविकांत तुपकरांनी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेली लढाई कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, कार्यकर्त्यांची धरपकड, राज्यभरातील नाकाबंदी आणि मंत्रालय परिसरातील वाढता पोलिस बंदोबस्त या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर नेमके कुठून आणि कधी आंदोलनस्थळी दाखल होतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तुपकर पोलिसांना चकवा देऊन मुंबईत पोहोचतात का, की पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त त्यांना रोखतो? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.














