Advertisement Advertisement

पोलीस असल्याची बतावणी करत वृद्ध दाम्पत्याला गंडा; २ लाख १० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास! किनगाव राजा-सिंदखेड राजा महामार्गावर धक्कादायक प्रकार; रक्षाबंधन आटोपून गावाकडे परतताना वृद्ध दाम्पत्याला अडवले…

किनगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून आपल्या गावाकडे परतणाऱ्या वृद्ध दाम्पत्याला अज्ञात दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करून अडवले. परिसरात चोऱ्या होत असल्याचे सांगत अंगावरील सोन्याचे दागिने काढून कापडात बांधून ठेवण्यास सांगितले. त्यानंतर नजर चुकवून तब्बल २ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करून दोघांनीही पोबारा केला. ही घटना २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास किनगाव राजा-सिंदखेड राजा महामार्गावर पेट्रोल पंपासमोरील पुलाजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, धनू मानसिंग पवार (वय ६८) व अनुसया धनू पवार (वय ६५), रा. वडगाव तांडा, ता. जि. जालना, हे रक्षाबंधनानिमित्त तालुक्यातील पांग्री उगले येथे आले होते. रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दोघेही एमएच २१ बीके २६७९ क्रमांकाच्या दुचाकीवरून आपल्या गावाकडे परतत होते.

दरम्यान, किनगाव राजा ते सिंदखेड राजा मार्गावरील पेट्रोल पंपासमोरील पुलाजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी हात दाखवून पवार दाम्पत्याला थांबविले. ‘आम्ही पोलीस आहोत, परिसरात चोऱ्या होत आहेत,’ असे सांगून त्यांनी अंगावरील दागिने काढून सुरक्षिततेसाठी एका कापडात बांधून ठेवण्यास सांगितले.

अज्ञात व्यक्ती पोलीस असल्याचे समजल्याने घाबरलेल्या पवार दाम्पत्याने त्यांच्या सांगण्यावरून अंगावरील सोन्याचे दागिने काढले. यामध्ये सुमारे ८ ग्रॅम वजनाची सोन्याची दाणी, अंदाजे किंमत १ लाख २० हजार रुपये, तसेच ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, अंदाजे किंमत ९० हजार रुपये, असा एकूण २ लाख १० हजार रुपयांचा ऐवज होता.

दागिने कापडात बांधून देण्याच्या बहाण्याने अज्ञात दोघांनी हा ऐवज लंपास केला आणि काही क्षणातच घटनास्थळावरून दुचाकीने पसार झाले. काही वेळानंतर आपली फसवणूक झाल्याचे पवार दाम्पत्याच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने नातेवाईकांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी किनगाव राजा-सिंदखेड राजा महामार्ग परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या या अज्ञात भामट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!