मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील ख्याँजा गरीब नवाज नगर परिसरात ३५ वर्षीय विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. फरजाना बी सलीम शाह (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फरजाना बी या पती सलीम शाह इब्राहिम शाह, दोन मुली आणि एका मुलासह ख्याँजा गरीब नवाज नगर, मोताळा येथे राहत होत्या. २९ ऑगस्ट रोजी त्यांचे दीर सलमान शाह इब्राहिम शाह हे बोदवड येथे असताना त्यांना अकरम शाह, मोताळा यांनी फोन करून फरजाना बी यांच्याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच सलमान शाह हे मोताळा येथे आले. त्यावेळी फरजाना बी या राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून, या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सफौ. अशोक आडोकार हे प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.













