मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने लागू करण्याच्या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने २५ ऑगस्ट रोजी मेहकर शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत निघालेल्या या मोर्चामुळे महापुरुषांच्या जयघोषाने आणि आरक्षण उपवर्गीकरणाच्या घोषणांनी मेहकर शहर दणाणून गेले.
यावेळी झालेल्या जाहीर सभेत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष विजय अंभोरे यांनी सरकारला इशारा दिला. “लाभ वंचितांचा वाटा आपल्याला मिळणार नाही, या भीतीने काहीजण आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करत आहेत. मात्र, उपवर्गीकरणाच्या आडवा जो येईल, त्याला मातंग समाज आडवे केल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
‘महाराष्ट्रात उपवर्गीकरणाला कोण आडवं येतंय?’
विजय अंभोरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देत महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला. तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण होऊ शकते, तर महाराष्ट्रात त्याला कोण अडथळा आणत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“सरकार अजून किती अंत पाहणार? समाज आता रस्त्यावर उतरला आहे,” असेही अंभोरे यांनी सांगितले.
२९ सप्टेंबरची डेडलाईन; अन्यथा मुंबईत धडकण्याचा इशारा…..
येत्या २९ सप्टेंबरपूर्वी अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाबाबत अध्यादेश काढण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दिलेल्या मुदतीत निर्णय झाला नाही, तर मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा विजय अंभोरे यांनी दिला.
मेहकर शहराला चढला पिवळा रंग
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. हातात पिवळे ध्वज, पिवळ्या टोप्या आणि रुमाल घेऊन मोठ्या संख्येने समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते.
महापुरुषांच्या जयघोषासह आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीच्या घोषणा देत मोर्चेकरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका येथे पोहोचले. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर स्वतंत्र मैदानात जाहीर सभेत झाले.
मान्यवरांची उपस्थिती
जाहीर सभेत उमरखेडचे माजी आमदार नामदेवराव ससाने, ज्येष्ठ समाजसेवक संतराम तायडे, राष्ट्रीय लहु शक्तीचे अध्यक्ष परिमल कांबळे, कैलास खंदारे, खाटीक समाजाचे नेते संजय धनाडे, अॅड. विलास साबळे, उज्वला जाधव आणि सुरेशराव मानवतकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी क्रांतीगुरू विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव पाटोळे, राष्ट्रीय लहु शक्तीचे प्रांताध्यक्ष समाधान साठे, लसाक्रमाचे राज्य सहसचिव ज्ञानदेव मानवतकर, नगरसेविका मंगलाताई मानवतकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बबनराव रत्नपारखी, रमेश बोरकर, महादेव बावरे, तुषार नेमाडे यांच्यासह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक ज्ञानदेव मानवतकर यांनी केले. सूत्रसंचालन समाधान साठे यांनी केले, तर प्रभाकर आवारे यांनी आभार मानले.















