सायकलचे ५०० रुपये अन् थेट मारामारी! तरुणाला गाडीत बसवून नेलं, नऊ जणांनी मिळून झोडपल्याचा आरोप; पोलिसांत गुन्हा….
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): सायकलच्या व्यवहारातील उर्वरित ५०० रुपये देण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. तरुणाला गाडीत बसवून भिवगाव येथे नेल्यानंतर चौघांसह पाच अनोळखी व्यक्तींनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी काचेच्या शिशीने डाव्या डोळ्याजवळ मारल्याने तरुण जखमी झाला. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी चार आरोपींसह पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश दिलीप राऊत (वय ३३, रा. अंबक नगर, देऊळगाव राजा) यांच्या काकांचा आरोपी शुभम किशोर डोंगरे याच्यासोबत सायकलचा व्यवहार झाला होता. या व्यवहारातील ५०० रुपये बाकी असल्याच्या कारणावरून २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता सावखेड भोई येथे वाद झाला.
यावेळी किशोर उत्तम डोंगरे याने फिर्यादीच्या काकांना शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर शुभम डोंगरे, किशोर डोंगरे आणि आतिष गणेश वाघमारे यांनीही मारहाण केल्याचा आरोप आहे.
काकांना सोडविण्यासाठी गेलेल्या मंगेश राऊत यांनाही आरोपींनी पकडले. आरोपी क्रमांक एकासह पाच अनोळखी व्यक्तींना गाडीत बसवून फिर्यादीला भिवगाव येथे नेण्यात आले. तेथे चौघे आरोपी आणि पाच अनोळखी व्यक्तींनी एकत्रितपणे शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.
काचेच्या शिशीने डोळ्याजवळ वार…..
मारहाणीदरम्यान आरोपी क्रमांक एकाने काचेची शिशी फिर्यादीच्या डाव्या डोळ्याजवळ मारल्याने दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच एका अनोळखी व्यक्तीने पट्ट्याने पाठीवर मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. आरोपी क्रमांक एक ते तीन यांनी ‘तुला पाहून घेतो’ अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले.
या प्रकरणी मंगेश राऊत यांच्या तोंडी रिपोर्टवरून देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात कायम अप क्रमांक ३९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५१(३) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशाने पोहेकॉ २१५५ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.














