बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील मोक्याच्या जयस्तंभ चौकात वाढदिवसाच्या शुभेच्छांचे पोस्टर लावण्यावरून मध्यरात्री जोरदार वाद झाल्याची घटना ३० ऑगस्ट रोजी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टर लावणाऱ्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी विक्की आव्हाड याच्यासह त्याच्या ७ ते ८ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नगर परिषदेची परवानगी घेऊन पोस्टर लावत असल्याचा दावा…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्याधर महाले मित्रमंडळाचे सदस्य मंदार बाहेकर हे प्रमोद गावंडे, मुन्नाभाऊ बेंडवाल, कौस्तुभ पाटील तसेच काही मजुरांच्या मदतीने जयस्तंभ चौकातील गांधी भवनासमोर वाढदिवसाचे फलक लावत होते. नगर परिषदेची परवानगी घेऊन हे पोस्टर लावण्यात येत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोस्टर लावण्याचे काम सुरू असतानाच एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून ३ ते ४ जण तेथे आले.
“इथं पोस्टर कसं काय लावता?” म्हणत वाद…
दरम्यान, विक्की आव्हाड हा आपल्या काही साथीदारांसह घटनास्थळी पोहोचला. त्यांनी “तुम्ही येथे पोस्टर कसे काय लावता?” असा जाब विचारत कार्यकर्ते आणि मजुरांशी वाद घातल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
यावेळी कार्यकर्ते व मजुरांना अश्लील शिवीगाळ करण्यात आली तसेच जीवे मारण्याची धमकी देत पोस्टर लावण्यास मज्जाव केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे जयस्तंभ चौकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
बुलढाणा शहर पोलिसांत गुन्हा दाखल….
घटनेनंतर संबंधितांकडून तक्रार प्राप्त होताच बुलढाणा शहर पोलिसांनी विक्की आव्हाड याच्यासह ७ ते ८ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९, २९६ आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक वाघमोडे करीत आहेत.
पोस्टर लावण्याच्या किरकोळ कारणावरून मध्यरात्री झालेल्या या वादामुळे शहरातील राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.













