मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज):समृद्धी महामार्गावर रविवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार घडला. मुंबई कॉरिडॉरवर धावत्या आयशर ट्रकला अचानक आग लागल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर पोलीस केंद्रांतर्गत समृद्धी महामार्ग उपकेंद्र दुसरबीड हद्दीत, चॅनल क्रमांक ३१२ वर सकाळी सुमारे ८.२१ वाजता ही घटना घडली. आयशर ट्रक (क्र. UP-65-RT-2140) नाशिककडे जात असताना अचानक बॅटरीमध्ये स्पार्किंग होऊन ट्रकला आग लागली.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या मदतीने सुमारे ११ वाजेपर्यंत आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली.
वाहन चालक रोहित कुमार (रा. गाजीपूर, उत्तर प्रदेश) याने सांगितले की, बॅटरीतून स्पार्किंग झाल्यामुळेच आग लागली. सुदैवाने तो सुरक्षित असून कोणालाही दुखापत झाली नाही.
दरम्यान, ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून परिसरात बॅरिकेटिंग करण्यात आले होते. त्यामुळे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यात आली.
या घटनेमुळे काही काळ समृद्धी महामार्गावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.














