धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : धाड पोलीस स्टेशन हद्दीतील सातगाव शिवारात नाल्यातील गाळ काढण्याच्या कारणावरून एका शेतकऱ्यावर अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेताच्या सीमेवरील नैसर्गिक नाल्यातील गाळ काढण्यास विरोध केल्याच्या कारणावरून आरोपीने शेतकऱ्यावर लाकडी काठीने बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुलमखेड येथील संजय पांडूरंग कानडजे (वय ४९) यांची शेती सातगाव शिवारात असून शेजारी आरोपी संतोष रामेश्वर कानडजे याची शेती आहे. दोन्ही शेतांच्या सीमेवरील नाल्यात साचलेला गाळ काढण्यासाठी आरोपी १८ एप्रिल रोजी सकाळी जेसीबी व ट्रॅक्टर घेऊन आला होता. यावेळी संजय कानडजे यांनी गाळ काढण्यास विरोध दर्शविल्याने वाद निर्माण झाला.
वादाचे रूपांतर थेट हल्ल्यात झाले. आरोपी संतोष कानडजे याने लाकडी काठीने संजय कानडजे यांच्या डाव्या हातावर व पाठीवर सपासप वार करून गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने शिवीगाळ करत पुन्हा आडवा आलास तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी जखमी संजय कानडजे यांच्या तक्रारीवरून धाड पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार सुनील सोनुने करीत आहेत. ग्रामीण भागातील शेतजमिनीच्या किरकोळ वादातून वाढत्या हिंसाचारामुळे चिंता व्यक्त होत आहे.













