बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज) – बुलढाणा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत अपघात, मारहाण आणि तोडफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून विविध पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बोराखेडी आणि नांदुरा परिसरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून जळगाव जामोद, मलकापूर आणि खामगाव परिसरात झालेल्या अपघातांमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच मारहाण, धमकी आणि तोडफोडीच्या घटनांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बोराखेडी येथे वृद्धाची आत्महत्या….
बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत तालखेड शिवारात समाधान बाबुराव खाकरे (वय ६८) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ७ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ते राजेंद्र गायकवाड यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. याप्रकरणी त्यांचे पुतणे वैभव खाकरे यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार दिलीप तडवी करीत आहेत.
नांदुरा येथे भीषण अपघातात एकाचा मृत्यू….
नांदुरा तालुक्यातील कोलासर फाट्याजवळ ९ मे रोजी पहाटे झालेल्या भीषण अपघातात पंढरी त्र्यंबक बगाडे (वय ५३) यांचा मृत्यू झाला. भरधाव वेगातील युनिकॉर्न मोटारसायकल क्रमांक एमएच-२८-बीयू-७६०५ ने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक व त्याच्या मागे बसलेला इसमही जखमी झाला आहे.
जळगाव जामोद येथे मिनीबस उलटली; आठ जण जखमी….
जळगाव जामोद तालुक्यातील सुणगावजवळ बहऱ्हाणपूर रोडवर प्रवाशांनी भरलेली मिनीबस क्रमांक एमपी-४६-टी-०९६३ उलटून मोठा अपघात झाला. चालक जोगेंद्र शिवचंद राम हा बस भरधाव वेगाने चालवत असताना नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. यात फिर्यादी संजय बरडे यांच्या आठ नातेवाईकांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला.
मलकापूरात स्कुटीला रिक्षाची धडक….
मलकापूर शहरातील कोलते कॉलेजसमोर अज्ञात अपे रिक्षाने एमपी-६८-एल-०६३९ क्रमांकाच्या स्कुटीला धडक दिली. या अपघातात मयंक झनके हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
खामगाव ग्रामीणमध्ये कार-दुचाकी अपघात….
खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत पारखेड फाट्याजवळ बलेनो कारने एमएच-१३-आरएफ-२१०८ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून वाहनाचे सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
नांदुरा येथे पेट्रोल पंपावर तोडफोड…..
नांदुरा येथील जीओ पेट्रोल पंपावर मजुरीच्या पैशांच्या वादातून मोठा गोंधळ झाला. आरोपी धर्मेश तायडे याने संतापाच्या भरात पेट्रोल पंपावरील नोझल व पाईप्सची तोडफोड केली. या घटनेत सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. “पैसे दिले नाहीत तर पेट्रोल पंप जाळून टाकीन,” अशी धमकीही आरोपीने दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
खामगावात जुन्या वादातून हाणामारी…..
खामगाव शहरातील बाळापूर फैल भागात जुन्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. शुभम माटकर हे घराबाहेर फोनवर बोलत असताना करण कोल्हे, विशाल कोल्हे आणि संभाजी कोल्हे यांनी त्यांच्यावर लाकडी काठीने हल्ला केला. या हल्ल्यात शुभम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार आहे.
जानेफळ येथे रस्त्याच्या कामात अडथळा….
जानेफळ ते अमडापूर रोडच्या कामावर देखरेख करणारे सुपरवायझर गौतम मोरे यांना आरोपी समाधान खरात याने अडवून शिवीगाळ केली. “मला कामावरून का काढले?” या रागातून आरोपीने स्वतःची मोटारसायकल हायवा गाडीच्या टायरखाली लोटून कामात अडथळा निर्माण केला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
बुलढाणा शहरात मद्यधुंद व्यक्ती व रिक्षाचालकावर कारवाई….
बुलढाणा शहर पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणाऱ्या रमेश जगताप याला ताब्यात घेतले. ही कारवाई दिपक जोग पेट्रोल पंपासमोर करण्यात आली. तसेच त्याच परिसरात रिक्षा एमएच-२८-आर-१२ वेडीवाकडी चालवणाऱ्या चालक अर्जुन लोखंडे याच्यावर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.













