देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील सुरा येथे जुन्या भांडणाची कुरापत काढत एका ७० वर्षीय वृद्धावर बांबूच्या काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरा येथील रहिवासी भास्कर एकनाथ चेके (वय ७०) हे १९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आपल्या मोटारसायकलने गावातून जात होते. त्यावेळी आरोपी प्रकाश सुरेश चेके (रा. सुरा) याने त्यांची गाडी अडवून जुन्या वादातून वाद घालत अश्लील शिवीगाळ केली. तसेच “जीव घेऊन टाकीन” अशी धमकी देत वेळूच्या (बांबूच्या) काठीने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.
या हल्ल्यात भास्कर चेके यांना गंभीर मार लागून ते जखमी झाले. घटनेनंतर त्यांनी अंढेरा पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी प्रकाश सुरेश चेके याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२), ११८(१), २९६ व ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारुती कायंदे करीत आहेत.













