चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : खरीप हंगाम तोंडावर आला असताना जिल्ह्यातील शेतकरी डिझेलसाठी अक्षरशः वणवण भटकत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांना कॅन व बॅरलमधून डिझेल देण्याचा निर्णय लागू करण्यात आला असून, हाच “जालना पॅटर्न” बुलढाणा जिल्ह्यात तात्काळ लागू करावा, अशी जोरदार मागणी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी केली आहे. अन्यथा शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
विनायक सरनाईक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात जिल्हा प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. “जिल्ह्यातील सत्ताधारी डिझेल बचतीच्या नावाखाली सायकलवर फिरून प्रसिद्धी स्टंट करत आहेत. मात्र दुसरीकडे डिझेलअभावी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर शेतात उभे आहेत. शेतकऱ्यांना पेट्रोलपंपांवर हेलपाटे मारावे लागत असल्याने त्यांचे श्रम आणि डिझेल दोन्ही वाया जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
सरनाईक यांनी शेजारच्या जालना जिल्ह्याचा दाखला देत सांगितले की, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अधिकृत कॅन व बॅरलमधून शेतकऱ्यांना डिझेल देण्याचे आदेश जारी केले आहेत. यासाठी ट्रॅक्टरचे आरसी बुक किंवा ‘अॅग्रिस्टॅक आयडी’ तपासून नोंद ठेवण्याची नियमावलीही लागू करण्यात आली आहे. “जालना प्रशासन शेतकऱ्यांसाठी असा निर्णय घेऊ शकते, मग बुलढाणा प्रशासनाचे हात कोणी बांधले आहेत?” असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.
“जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ ‘डिझेल मुबलक आहे’ अशा पोकळ घोषणा न करता प्रत्यक्ष जमिनीवर उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर पंपावर फिरवण्यापेक्षा त्यांना जागेवरच डिझेल मिळेल, अशी व्यवस्था उभी करावी,” अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, २५ तारखेला होणाऱ्या आंदोलनाचा इशारा देताना सरनाईक म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटण्यापूर्वी प्रशासनाने भानावर यावे. अन्यथा होणाऱ्या तीव्र आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील.”
जालना पॅटर्नप्रमाणे बुलढाण्यातही निर्णय होणार की प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या ‘सायकल ड्रामा’मध्येच गुंतून राहणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
















