बुलढाणा (जिमाका : बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात मागील दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने काही भागातील पिकांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. विशेषतः फुलोरा व शेंगा लागण्याच्या अवस्थेतील सोयाबीन पिकाला पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शनिवार, ४ सप्टेंबर रोजी खामगाव तालुक्यातील विविध गावांच्या शेतशिवारात जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यंदा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पेरणी झालेल्या पिकांची सुरुवातीची वाढही चांगली झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात यंदा तब्बल ३ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. सध्या सोयाबीन पीक फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत असल्याने पावसाचा खंड पडल्याचा प्रतिकूल परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
टेंभुर्णासह सात गावांतील शेतशिवारांची पाहणी….
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी टेंभुर्णा, अटाळी, शाहापूर, आडगाव, बोरी, शिर्ला आणि नेमाने या गावांतील शेतशिवारांना भेटी देऊन पिकांची सद्यस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत पिकांची अवस्था, पावसाची आवश्यकता आणि संभाव्य नुकसानीबाबत माहिती घेतली.
पावसाचे प्रमाण हा निसर्गाशी संबंधित विषय असला तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून परिस्थितीनुसार आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांना दिली.
नुकसानग्रस्त पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करा…..
पावसाअभावी सुकत चाललेल्या पिकांची संबंधित यंत्रणांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करावी आणि नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच झालेल्या नुकसानीची अचूक माहिती शासनास सादर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा कृषी अधिकारी संतोष डाबरे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, संतोष डिवरे, अमोल अंधारे, राजू बघे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.















