मंगरुळ नवघरे (बुलडाणा कव्हरेज न्युज): बकरी विक्रीचे पैसे मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरून बाप-लेकामध्ये झालेला वाद एवढा विकोपाला गेला की, एकुलत्या एक मुलानेच जन्मदात्या वडिलांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नायगाव बु. येथे २९ ऑगस्टच्या रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृतकाचे नाव कचरुबा वामन गायकवाड (वय ६०) असे असून ते पत्नी बेबीबाई (वय ५५) व कुटुंबीयांसह नायगाव बु. येथे राहत होते. त्यांना एकुलता एक मुलगा आणि चार मुली असा परिवार आहे. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात ज्या मुलाकडून आधाराची अपेक्षा होती, त्याच मुलाच्या हातून वडिलांचा मृत्यू झाल्याने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चार मुलींच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरपल्याने गावातही हळहळ व्यक्त होत आहे.
बकरीच्या पैशांवरून वाद, राग अनावर….
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कचरुबा गायकवाड यांनी त्यांचा मुलगा विनोद कचरुबा गायकवाड (वय ३८) याच्याकडे बकरी विक्रीचे पैसे मागितले. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद वाढत गेल्यानंतर विनोद याने वडिलांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर लोखंडी फुकणीने त्यांच्या पोटावर, छातीवर व डोक्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे.
या मारहाणीत कचरुबा गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
अमडापूर पोलिसांकडून आरोपी मुलाला अटक…
घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली. मृतकाची पत्नी बेबीबाई कचरुबा गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी विनोद गायकवाड याच्याविरुद्ध अमडापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी विनोद गायकवाड यास अटक केली आहे. बकरी विक्रीच्या पैशांवरून सुरू झालेला वाद थेट जन्मदात्या वडिलांच्या मृत्यूपर्यंत पोहोचल्याने या घटनेने नायगाव बु. परिसर हादरला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप व रायटर प्रदीप चोपडे करीत आहेत.














