खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन तिच्याशी वाद घालणाऱ्या पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना खामगाव शहरातील गोपाळ नगर परिसरात ३० ऑगस्टच्या रात्री घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
गोपाळ नगर भागातील घरकुल परिसरात गणेश महादेव डाबेराव हा पत्नी लक्ष्मी व मुलांसह राहत होता. पती-पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, गणेश हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात यापूर्वीही वाद होत होते. वादानंतर दोघे पुन्हा एकत्र राहत असल्याचे सांगण्यात आले.
मात्र, ३० ऑगस्टच्या रात्री याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वाद वाढल्यानंतर गणेशने पत्नीला मारहाण केली. या घटनेत लक्ष्मी गंभीर जखमी होऊन घरात बेशुद्ध पडली. घरातून आरडाओरड ऐकून शेजारी राहणारे रोहन देविदास घोडाम घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर लक्ष्मीला उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला अकोला येथे हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.
याप्रकरणी शेजारी राहणारे रोहन घोडाम यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी गणेश डाबेराव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
मृत लक्ष्मी यांच्या पश्चात चार वर्षांची एक मुलगी आणि दोन लहान मुले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मंदार पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.













