Advertisement Advertisement

डोक्यावर जीव घेऊन ड्युटी! जनतेला राखणारे पोलीसच जीव मुठीत धरून राहताय; अंढेरा क्वार्टर्सची झाली पार चाळण!

अंढेरा (बुलडाणा  कव्हरेज न्युज)कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र जनतेच्या सेवेत तत्पर असणाऱ्या अंढेरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली शासकीय पोलीस निवासस्थाने अत्यंत जीर्णावस्थेत असून ती कधीही कोसळू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पोलीस क्वार्टर्सच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले असून छताचे प्लास्टर सतत निखळत आहे. पावसाळ्यात छतातून पाणी गळते, भिंतींमध्ये ओलावा निर्माण होतो आणि शॉर्टसर्किटचा धोका वाढतो. त्यामुळे येथे राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना कायम भीतीच्या छायेत दिवस काढावे लागत आहेत.

या भीषण परिस्थितीमुळे अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबांना क्वार्टर्समधून हलवले असून नाईलाजाने बाहेर महागड्या भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. आधीच चोवीस तासांची ड्युटी आणि त्यात घरभाड्याचा अतिरिक्त आर्थिक भार यामुळे कर्मचाऱ्यांवर मानसिक ताण वाढत असल्याचे सांगितले जात आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नाकडे वारंवार दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. जीर्ण झालेली जुनी इमारत तातडीने पाडून त्या ठिकाणी आधुनिक, सुरक्षित आणि सर्व सुविधा असलेली नवीन पोलीस निवासस्थाने उभारावीत, अशी मागणी पोलीस कर्मचारी आणि नागरिकांकडून जोर धरत आहे.

कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनाच स्वतःच्या जीवाची भीती वाटत असेल, तर ही परिस्थिती प्रशासनासाठी निश्चितच चिंतेचा विषय असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!