Advertisement Advertisement

आरपारच्या लढाई’साठी शेतकऱ्यांनो एकत्र या; शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा – विनायक सरनाईक

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा तसेच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उद्यापासून “आरपारची लढाई” छेडण्याचा एल्गार पुकारला आहे. या आंदोलनात शेतकरी,पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे.

रविकांत तुपकर हे रविवार, दि. 14 जून रोजी सकाळी 9 वाजल्यापासून त्यांच्या निवासस्थानासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहेत. ही लढाई केवळ एका नेत्याची नसून महाराष्ट्रातील प्रत्येक कर्जबाजारी आणि पीकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्याची असल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे.

सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी खताचा तुटवडा, कर्जमाफीबाबतचा गोंधळ आणि हक्काचा पीकविमा न मिळणे यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे सांगितले. शासन एका बाजूला नुकसानभरपाई देऊन पिकांचे नुकसान मान्य करते, मात्र दुसऱ्या बाजूला कठोर अटी घालून पीकविमा नाकारते, ही सरकारची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोपही त्यांनी केला.

“रविकांत तुपकर यांनी सुरू केलेली ही आरपारची लढाई यशस्वी करायची असेल आणि शासनाकडून सरसकट कर्जमुक्ती व हक्काचा पीकविमा मिळवून घ्यायचा असेल, तर प्रत्येक शेतकऱ्याने एकजुटीने आंदोलनात सहभागी व्हावे,” असे आवाहन विनायक सरनाईक यांनी केले.

ही कर्जमाफी नसून आकड्यांचा खेळ – सरनाईक

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीवरही सरनाईक यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांमध्ये पात्र शेतकऱ्यांची माहिती स्पष्ट होती. मात्र यावेळी किती शेतकरी पात्र आहेत, कोणाला किती लाभ मिळणार आहे, याबाबत ना शेतकऱ्यांकडे माहिती आहे, ना बँकांकडे, असा दावा त्यांनी केला.

सरकारने 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमाफी आणि 65 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात प्रशासनाकडे पात्र लाभार्थ्यांची स्पष्ट यादीच नसल्याचा आरोप त्यांनी केला.

सरनाईक यांनी शासनाकडे तातडीने खालील माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे:

  • प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची संख्या.
  • 50 हजार रुपयांच्या लाभासाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या.
  • 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची संख्या.
  • OTS (वन टाइम सेटलमेंट) योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या.

“कोणाला किती लाभ मिळणार हे स्पष्ट नसताना केवळ कोट्यवधी रुपयांच्या कर्जमाफीची आकडेवारी जाहीर करणे म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल आहे. ही खरी कर्जमाफी नसून केवळ आकड्यांचा खेळ असून अप्रत्यक्षपणे कर्जवसुलीच आहे,” असा घणाघाती आरोपही विनायक सरनाईक यांनी केला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!