Advertisement Advertisement

इसरूळच्या मातीतून घडले तीन अग्निवीर; जिद्द, मेहनतीच्या जोरावर भारतीय सैन्यात निवड

इसरूळ (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील शेवटचे गाव म्हणून ओळख असलेल्या इसरूळ गावाने पुन्हा एकदा देशसेवेचा मान उंचावला आहे. शेतकरी कुटुंबातील आणि बेताच्या आर्थिक परिस्थितीत वाढलेल्या तीन तरुणांनी अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भारतीय सैन्य दलातील अग्निवीर पदासाठी निवड मिळवून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

इसरूळ गावासाठी सैन्य भरती ही नवी बाब नसली, तरी एकाच वेळी तीन तरुणांची सैन्यात निवड होणे ही गावासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी घटना ठरली आहे. गावातील अनेक युवकांनी यापूर्वीही सैन्य दलात उल्लेखनीय कामगिरी बजावली असून आजही भारतीय सैन्य व नौदलात सुमारे २८ जवान विविध पदांवर कार्यरत आहेत. यामध्ये मेजर, सुभेदार, नायब सुभेदार, हवालदार यांसारख्या उच्च पदांवरील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. अनेक सैनिकांनी देशसेवा बजावून सन्मानाने निवृत्ती घेतली आहे.

कारगिल युद्धासह विविध महत्त्वाच्या लष्करी मोहिमांमध्ये इसरूळच्या जवानांनी जबाबदारीची भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे गावात देशसेवेची परंपरा आजही कायम असून नवीन पिढीही त्याच पाऊलवाटेवर चालत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अलीकडेच छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या सैन्य भरती प्रक्रियेत शरद विनोद खांबट, समाधान संजय सोलाट आणि संतोष यशवंत खरात या तिन्ही तरुणांनी यश संपादन करत अग्निवीर पदासाठी निवड निश्चित केली. त्यांच्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या तिन्ही तरुणांनी कठोर मेहनत, नियमित सराव आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश मिळविले असून त्यांच्या यशामुळे इतर युवकांनाही प्रेरणा मिळत आहे. इसरूळ गावाच्या देशसेवेच्या परंपरेला पुढे नेणाऱ्या या तिन्ही अग्निवीरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!