बुलढाणा(जिमाका: बुलडाणा कव्हरेज न्युज) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे जिल्हाभरातील महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ई-केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत जमा न करू शकलेल्या महिलांना जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याची परवानगी देण्यात आल्याची चर्चा सुरू होती. मात्र ही माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महिला व बाल विकास विभागाकडून अशा प्रकारचे कोणतेही आदेश शासनस्तरावरून देण्यात आलेले नसल्याचे सांगण्यात आले आहे. या अफवांमुळे जिल्हा, शहर आणि तालुका स्तरावरील महिला व बाल विकास कार्यालयांमध्ये महिलांची अनावश्यक गर्दी होत असून प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुले यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च २०२६ चा हप्ता लवकरच पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. महिलांनी संयम राखून अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये.
दरम्यान, मार्च व एप्रिल २०२६ चे हप्ते ई-केवायसी पूर्ण करूनही काही महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. याबाबत शासनस्तरावर तांत्रिक प्रक्रिया सुरू असून येत्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
मागील काही महिन्यांपासून लाभ न मिळालेल्या महिलांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही कार्यालयात अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.















