मेहकर(बुलडाणा कव्हरेज न्युज)तालुक्यातील घाटबोरी गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या आदिवासीबहुल नागेशवाडी गावात दूषित पाण्यामुळे डायरीयाचा मोठा प्रादुर्भाव झाला असून शंभराहून अधिक ग्रामस्थ बाधित झाले आहेत. गावात अनेक दिवसांपासून अतिसार, उलट्या व हगवणीचा त्रास सुरू होता. मात्र, मागील चार ते पाच दिवसांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने अखेर आरोग्य विभागाला तातडीने धाव घ्यावी लागली.
१५ मे रोजी दुपारी जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय बलकार, देऊळगाव साकर्शा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत राठोड यांच्यासह सुमारे २० जणांचे आरोग्य पथक नागेशवाडीत दाखल झाले. पथकात आठ आरोग्यसेवक व सात आरोग्यसेविकांचाही समावेश होता. त्यांनी गावात घरोगरी जाऊन रुग्णांची तपासणी करत प्राथमिक उपचार सुरू केले.
तीस रुग्णांची प्रकृती गंभीर…
गावातील सुमारे ६० रुग्णांना गॅस्ट्रोचा तीव्र त्रास झाला असून नऊ महिला, दहा पुरुष व अन्य अशा एकूण तीस रुग्णांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तर अनेक रुग्णांवर गावातच सलाइन लावून उपचार सुरू आहेत.
अशुद्ध पाणी ठरलं संकटाचं मूळ…
नागेशवाडी हे अवघ्या पाचशे लोकसंख्येचं गाव आहे. गावाला टेंभूरखेड तलावाजवळील विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी कोणतेही शुद्धीकरण न करता थेट गावात सोडले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याच दूषित पाण्यामुळे गावात डायरीयाचा फैलाव झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
आरोग्य विभागाने घेतले पाण्याचे नमुने…
यापूर्वी १४ मे रोजी सीएचओ डॉ. गवळी, आरोग्य सेविका व आरोग्य सेवकांनी गावात भेट देत पाण्याचे नमुने घेतले होते. काही रुग्णांना औषधेही देण्यात आली होती. मात्र, गावात तत्काळ आरोग्य कॅम्प न लावल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
घरोघरी ब्लिचिंग पावडर, ओआरएसचे वाटप…
आरोग्य विभागाने गावातील प्रत्येक घरात ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याचे शुद्धीकरण सुरू केले आहे. ग्रामस्थांना ओआरएसच्या पुड्याही देण्यात आल्या. तसेच मुख्य जलस्त्रोत असलेल्या टेंभूरखेड येथील विहिरीचे सुपर क्लोरिनेशन करण्यात आले.
“गावातच आरोग्य कॅम्प लावा” – ग्रामस्थांची मागणी…
“खासगी डॉक्टर गावात येऊन उपचार करू शकतो, मग आरोग्य विभाग कायमस्वरूपी कॅम्प का लावत नाही?” असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला. घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांची प्रकृती अचानक बिघडल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गावात तातडीने आरोग्य कॅम्प उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.















