बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहर पोलिस स्टेशन हद्दीतील माळविहीर शिवार, खामगाव रोडवरील संतनगरी परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती डायल ११२ वर मिळताच बुलढाणा शहर पोलिसांनी तातडीने अॅक्शन घेत हा बालविवाह रोखला. ही कारवाई शुक्रवार, १५ मे रोजी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, संतनगरी परिसरात अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्याचवेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय तसेच चाईल्ड हेल्पलाईननेही बालविवाह रोखण्यासाठी शहर पोलिसांकडे मदत मागितली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांनी तातडीने पथक रवाना केले.
महिला व बालविकास विभाग, चाईल्ड हेल्पलाईन स्टाफ आणि पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी माहितीची खातरजमा करून होणारा बालविवाह थांबवला तसेच संबंधितांवर पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड आणि बुलढाणा उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज रबडे, महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल अनिता आराख, पोलिस नाईक सतीश पवार आणि पोलिस कॉन्स्टेबल विकास सुरडकर यांनी कारवाईत सहभाग घेतला.
दरम्यान, बालविवाहासारख्या बेकायदेशीर प्रकारांची माहिती नागरिकांनी तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांनी केले आहे.













