Advertisement Advertisement

धक्कादायक ! जिल्ह्यात बेपत्ता होण्याच्या घटनांचा सुळसुळाट; ५ दिवसांत ७ जण गायब! तरुणी, महिला, बालकांसह अपंग व्यक्तीही बेपत्ता; तस्करीचा संशय?

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांत बेपत्ता होण्याच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून अवघ्या काही दिवसांत तब्बल ७ नागरिक गायब झाल्याची धक्कादायक नोंद समोर आली आहे. यात तरुण मुली, विवाहित महिला, लहान बालक तसेच पुरुषांचा समावेश असल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमागे मानवी तस्करी किंवा एखाद्या संघटित टोळीचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील अटाळी येथील राधिका संतोष वसतकार (१८) ही २० एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता “लहान बहिणीसाठी खाऊ आणते” असे सांगून घराबाहेर पडली; मात्र ती अद्याप परतलेली नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला तरी तिचा काहीच पत्ता लागलेला नाही.

नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीतील पिंप्री अढाव येथील धर्मा रणछोड रणित (५०) हे ११ एप्रिल रोजी कामावर गेले होते, परंतु ते परतच आले नाहीत. दहा दिवस उलटूनही त्यांचा शोध लागलेला नसल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत.

शेगाव तालुक्यातील खेर्डा येथून अश्विनी सुनील निंबाळकर (२६) ही महिला आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलीसह (आरोही) अचानक घरातून निघून गेली. आईसह चिमुकली बेपत्ता झाल्याने ही घटना अधिक गंभीर ठरली आहे.

अपंग बांधवही बेपत्ता !

खामगाव तालुक्यातील शहापूर येथील राजरतन दिगांबर इंगोले (४०), जे पायाने अपंग आहेत, ते १५ एप्रिल रोजी मुलींना आणण्यासाठी बुलढाण्याकडे निघाले होते. मात्र, ते ना मुलींपर्यंत पोहोचले ना घरी परतले. या घटनेमुळे सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा बुद्रुक येथील किरण सरदार सोलंकी (१९) ही तरुणी मध्यरात्रीच्या सुमारास बेपत्ता झाली. रात्री घरात असलेली तरुणी पहाटे अचानक गायब झाल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

तसेच मेहकर येथील सिंधूताई जाधव महिला कॉलेजमध्ये परीक्षा देण्यासाठी गेलेली निकीता सतीश खिल्लारे (२०) ही पेपरनंतर घरी परतलीच नाही. शिक्षणासाठी बाहेर पडणाऱ्या तरुणींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एकाच वेळी जिल्ह्यातील विविध भागांतून नागरिक बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्याने पोलीस यंत्रणेपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या घटनांकडे पोलीस अधीक्षक कार्यालयाने गांभीर्याने लक्ष देऊन तपासाची गती वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!