बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज) : बहिणीच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे समाजात व मित्रपरिवारात बदनामी होत असल्याचा राग मनात धरून सख्ख्या बहिणीची निर्घृण हत्या करणाऱ्या भावाला बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी हा निकाल दिला.
शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव सागर त्र्यंबक शर्मा (जाधव) असून, मृत महिलेचे नाव अंकिता (वय २८) असे आहे. ही घटना २८ जुलै २०२० रोजी बुलढाणा शहरातील विदर्भ हाउसिंग सोसायटी परिसरात घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता हिच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे आपली बदनामी होत असल्याची भावना आरोपी सागरच्या मनात होती. याच रागातून त्याने पहाटेच्या सुमारास केबल वायरने बहिणीचा गळा आवळला व त्यानंतर चाकूने वार करून तिची हत्या केली. खून केल्यानंतर मृतदेह घरातील बाथरूममध्ये ठेवण्यात आला होता.
विशेष म्हणजे, घटनेपूर्वी आरोपीने त्याची आई कोकिळा जाधव व मृत अंकिताच्या मुलांना घराबाहेर पाठविले होते. त्यानंतर त्याने एकट्याने हा कट रचून खून केला. दुसऱ्या दिवशी आरोपी स्वतः बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि आईला फोन करून खून केल्याची कबुलीही दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे भौतिक पुरावे गोळा केले. तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेला चाकू, रक्तरंजित कपडे तसेच केबल वायर जप्त करण्यात आली. वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अहवालासह साक्षीदारांचे जबाब आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.












