Advertisement Advertisement

“मटणाच्या भाजीवरून अपंग मेंढपाळाला काठीने झोडपलं; इसरूळ शिवारातील घटना…

अंढेरा(बुलडाणा कव्हरेज न्युज) इसरूळ शिवारात मेंढ्यांचा मुक्काम घालण्यासाठी आलेल्या एका अपंग मेंढपाळाला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भीमराव रामराव काळे (वय ५८, रा. इसरूळ, ता. चिखली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विनोद रामदास खांबट (रा. इसरूळ) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 351(2) व 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ५ जून रोजी रात्री १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास इसरूळ शिवारातील शेख मन्नू शेख दादू यांच्या शेतात घडली. शेतात मेंढ्यांचा मुक्काम सुरू असताना मटणाची भाजी तयार केली जात होती. यावेळी भाजी सांडल्याच्या कारणावरून आणि जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपीने भीमराव काळे यांच्यावर लाकडी काठीने हल्ला केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत त्यांच्या मान, पाठ आणि दोन्ही पायांवर गंभीर मार बसला. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

मारहाणीनंतर जखमी झालेल्या भीमराव काळे यांनी दुसऱ्या दिवशी पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी त्यांना रेफर केल्याने त्यांनी बुलढाणा येथे उपचार घेतले. उपचार पूर्ण झाल्यानंतर ११ जून रोजी अंढेरा पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार दिली, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

विशेष म्हणजे, मेंढपाळ शेतकऱ्यांच्या शेतात मेंढ्यांचा मुक्काम करून नैसर्गिक खत पुरवतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. अशा परिस्थितीत एका अपंग मेंढपाळावर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून, कायद्याचा धाक कमी झाला आहे का, असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश देढे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!