मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतातील सामायिक विहिरीच्या हिस्स्यावरून दोन शेतकरी कुटुंबांमध्ये वाद निर्माण होऊन शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना मेंडगाव येथे घडली. याप्रकरणी अंढेरा पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
. जाहिरात 👆
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेंडगाव येथील उषाबाई दत्तात्रय गीते आणि काशिनाथ शंकर घुगे यांची शेतजमीन लगत असून त्या ठिकाणी एक सामायिक विहीर आहे. विहिरीजवळ दगड-मातीचे ढिगारे असल्याने शेतीच्या कामात अडथळा येत असल्यामुळे उषाबाई गीते या ढिगारा हटविण्यासाठी गेल्या असता काशिनाथ घुगे यांनी विहिरीत आपला हिस्सा असल्याचे सांगून त्यास विरोध केला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. उषाबाई गीते यांच्या तक्रारीनुसार, काशिनाथ घुगे यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी काशिनाथ शंकर घुगे (रा. मेंडगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 296, 351(2) व 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, काशिनाथ शंकर घुगे (वय 54) यांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, 2 जून रोजी सकाळी सुमारे 9 वाजता ते शेतातील मोटार सुरू करण्यासाठी विहिरीजवळ गेले असता उषाबाई दत्तात्रय गीते, दत्तात्रय उत्तम गीते व गौरव दत्तात्रय गीते हे जेसीबीच्या सहाय्याने विहिरीतील गाळ व माती काढत होते. विहीर सामायिक असल्याने नियमानुसार काम करण्यास सांगितल्यावर संबंधितांनी शिवीगाळ केली तसेच धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी उषाबाई दत्तात्रय गीते, दत्तात्रय उत्तम गीते व गौरव दत्तात्रय गीते (सर्व रा. मेंडगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 296, 115(2), 351(2) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास अंढेरा पोलीस करीत आहेत.












