खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील एका ३५ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी निलेश अरुण वानखडे (वय ३६, ता. खामगाव) हे नातेवाईक असून शेजारी राहतात. आरोपी मागील काही दिवसांपासून महिलेचा पाठलाग करीत तिच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घटनेच्या दिवशी महिला आपल्या घरात झोपलेली असताना आरोपीने थेट घरात प्रवेश करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. यावेळी महिलेने आरडाओरड केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, महिलेच्या पतीने आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांना ढकलून तेथून पसार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७५, ७८, ३३३, ३५२ आणि ३५१ (२)(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार भगवान काळबागे करीत आहेत.














